प्रस्तावना
कविता ही क्रिप्टॉलॉजी
पहिल्यांदा हे पुस्तक छापलं ते 1996 या वर्षी. त्याकाळाच्या समवेत असलेले बहुतेक लोक आता नाहीत. थोडेच शिल्लक आहेत. त्यावेळेला याची पुढची आवृत्ती निघेल असं चुकूनसुद्धा वाटलं नव्हतं.
कवितेला काहीतरी शोधून काढायचं असतं. कविता हा शोध घेणारा जीव आहे. जगातल्या, जीवसृष्टीतल्या, माणसामाणसांच्या, समुहासमूहाच्या आयुष्यकाळात अनेक गोष्टी घडतात. त्या घटनांची व्यावहारिक संगती कोणतीही मानवजात लावतच असते पण तिची पराव्यावहारिक संगतीही लागावी लागते. ते काम कविता करते. कविता ही क्रिप्टॉलॉजी असते. कवी हा क्रिप्टॉलॉजिस्ट असतो. कवितचे कवितापण तिच्या क्रिप्टॉलॉजीत आहे. जगण्यात आणि जगात, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विस्मय भरलेला असतो. जग आणि जीवन हे विस्मयरूप आहे. त्या विस्मयाची अनेक रूपे माणसाला रोज भेटतात. त्यांना तो लक्षित किंवा दुर्लक्षित करत असतो. या सनातन विस्मयाचा उलगडा करणे कवितेचे काम असते. ही विस्मयाचा उलगडा करण्याची प्रेरणा म्हणजेच काव्याची प्रेरणा. ही प्रत्येक माणसात निसर्गतःच असते. हे विस्मय भाषादत्त असतात किंवा भाषातीतही असतात.
सैन्यात शत्रूपक्षाचे बिनतारी संदेश पकडून ते उकलणारे किंवा सॉफ्टवेअरचे पासवर्डस मिळवणारे, सोर्सकोड हुडकून काढणारे किंवा ध्वनिशास्त्रात साउंडमधून ‘नॉइज टू सिग्नल’ असा एक रेश्यो असतो तो रेश्यो ओळखून ‘सँपल साउंड’मधून त्यातला सिग्नल वाचणारे अन विश्लेषित करून त्याचा अन्वयार्थ मांडणारे — असे क्रिप्टॉलॉजिस्ट असतात. कवी हा असाच संस्कृतीचा क्रिप्टॉलॉजिस्ट असतो. कविता ही क्रिप्टॉलॉजी असते. संकेतभेद करणे हे कवीचे काम. आणि तो संकेतभेद केल्यावर पुन्हा त्याचा आशय किंवा अन्वयार्थ जवळपास स्वयंनिरपेक्ष (डिव्हाईस-इंडिपेंडन्ट) स्वरूपात बांधणे, ते करताना भाषेच्या नियमांची, दंडुकेशाहीची फिकीर न करता, प्रसंगी अभिरुचीला छेद देत, वाचकाला अंतर्मुख करून त्याच्या जिज्ञासेचा प्रक्षोभ घडवून आणणे हे काम कविता करते. कविता ही संकेतभेदाची विद्या आहे. ती नुसते शास्त्र नाही. ती नुसती कला नाही. ती विद्या आहे, जिच्यात शास्त्र आणि कला दोन्ही येतात.
अगदी ढोबळ उदाहरण — कोकीळ पक्षी जोडीदाराला जी साद घालतो — शक्यतो मेटिंगसाठी, ती साद हा कोकीळ आणि कोकीळिणीचा आपसांतला संकेतव्यवहार आहे. तो संकेत कोकिळाच्या जोडीदारासाठी आहे, माणसासाठी नाही. तरीही माणूस चोंबडेपणाने तो संदेश पकडतो. त्याचा कोकिळेसाठी असलेला अर्थही जाणतो अन ‘वसंत ऋतू आलाय’ किंवा अमुक तमुक ढमुक असेल इत्यादी स्वत:साठी असलेला अर्थही उलगडतो. म्हणजे तो त्या संकेतातून अर्थाला मुक्त करतो, ‘वाचतो’, संकेतभेद करतो. कवी हेच करतो. माणुसतेच्या आघाडीवर माणसांचे अन दुनियेचे काय काय घडतेय? काय गावतेय? काय हुकतेय? त्याचे सिग्नल कवी पकडतो. अन ते बोंबलून बोंबलून, टाहो फोडून जगाला सांगतो . . . तर, एखादी कविता जर ‘कविता’ असेल, तर तिचे कवितापण याच्यात आहे.
चित्रकार गायतोंडेंच्या बाबतीत असं सांगितलं जायचं की ते तासंतास समुद्राकडे बघत बसत. कोणी म्हणतं त्यांना क्षितिजाचा शोध घ्यायचा होता, कोणी म्हणे त्यांना आकाशातून रंग शोधायचे होते, कोणी म्हणे त्यांना लाटांतून लय सापडायची . . . वगैरे . . . पण याकडे अजून गांभिर्यानी बघता येईल . . . गायतोंडे हे मूळचे गोव्याचे. गोव्याचा निसर्ग आणि समुद्र हा त्यांच्या वांशिक नेणीवेत, डिएनए मधे होता. माणसाला जशी समकालीन नेणीव असते तशी अनुवंशिक नेणीवही असते. ती त्याच्या पेशींच्या स्मृतिकोशातून, कुटुंबकबिल्यातून त्याच्यापर्यंत झिरपते. स्वतःच्या वांशिक नेणीवेतला हा समुद्र उपसून काढून तो त्यांना चित्रपटलावर आणायचा होता. आणि ते करताना तो आतला समुद्र बाहेरच्या समुद्राबरोबर ताडून पाहायचा (व्हेरिफाय करायचा) होता. समुद्राची अनेक लोभस, अजस्त्र, हिंस्त्र रूपे आणि त्याची लयकारी, त्याचे गावोगावीचे-देशोदेशीचे किनारे, बंदरे, आख्यायिका, समुद्री जीव, मासेमार, भूतेखेते, प्रथा, मिथके, सांगोवांगी कथाकहाण्या या सगळ्यांतून वाहणारी शहाणीवेची सूक्ष्म धारा त्यांना शोधायची होती. ती त्यांनी नेणीवेतून शोधून, ओढून आणून, चित्रात ओतली. ही अशी चित्रे म्हणजे दुसरं काही नसून कविताच असतात. ही प्रक्रिया म्हणजेच विस्मयाचा उलगडा. म्हणजेच क्रिप्टॉलॉजी! भाषा शब्दांची नाही. तर रंगांची, आकारांची आहे. एवढाच इथे फरक. काव्य हेच असते.
कवीला सदासर्वदा काळाच्या बरोबरीने धावता येत नाही. सहकालीनता हीदेखिल एकप्रकारे धारणाच (नोशन) असते. हे जाणवल्यानंतर कवीने काळाच्या कांचनमृगामागे न धावता स्वतःत आत उतरायला लागतं.
1996ला जेव्हा या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली तेव्हा असं वाटलं होतं की — आजचा माणूस चहुबाजूंनी झपाट्याने विवस्त्र होत चाललेला माणूस आहे. वास्तवाचा शोध ‘आपण घेणं’ ही कल्पनाच आता वेडगळपणाची ठरणारे उलट वास्तवच आपला शोध घेत आपल्या मागावर आहे आणि आता आपल्याला लपायला जागा शिल्लक नाही! प्राणांतिक धडपड केल्याशिवाय मराठी भाषा आणि संस्कृतीसुद्धा टिकाव धरू शकणार नाही. अन् जनसमूहाचा बुद्ध्यांक झपाट्याने खालावत जाणार आहे . . .
गेल्या वीसेक वर्षांच्या काळात घडलेल्या गोष्टींनी ही धास्ती अंशतः खरी ठरली. मानवी विवेकाची आवाहनक्षमता जवळपास शून्यावर आली. अभ्यास, टीका, चिकित्सा, उपहास, आक्षेप, उपरोध अशी अवजारे जनवर्तनाच्या अविवेकावर अंकूश ठेवण्यासाठी निरुपयोगी ठरली आहेत. आज कोणी आतड्यापासून तळमळीनी काही मांडलं, सांगितलं तर ते हसण्यावारी नेलं जातं किंवा फारतर एक किस्सा म्हणून शेअर केलं जातं. जागतिकीकरणानंतरच्या सुपरकॅपिट्यॅलिझमच्या नेत्रदाहक, झगमगाटी सावटाखाली जगभर देशोदेशींच्या जागल्यांचे अन् विवेकाचे आवाज आता इतके क्षीण, अगतिक आणि एकांडे होत चाललेत की नासाडीचा हाच क्रम कायम राह्यला तर माणसाला स्वतःच्या जगण्यात काही भूमिकाच शिल्लक नसेल आणि जर स्वतःला स्वतःच्या आयुष्यात काही भूमिकाच नसेल तर स्वतःचा शोध घेण्याचा हुरूप मावळेल. हा हुरूप मावळला तर लवकरच माणूसच माणसाला नकोसा होईल. तो दिवस दूर नाही . . .
— सलील वाघ