पत्रातून होणारा आंतरिक संवाद आजच्या माध्यमयुगात बेदखल झालेला असताना ऐन तरुणाईत आपल्या मित्र, आप्तांना लिहिलेली ही अतिशय वैयक्तिक स्वरूपाची पत्रे पुस्तकरूपाने यावीत हा निव्वळ योगायोग नाही. अनवरत मधील ही पत्रे म्हणजे केवळ भावनिक स्वगतं नाहीत. एखाद्या दीर्घ कथनाचा अवकाश घेऊन आलेला, काव्यभाषेतून प्रकटलेला एक अस्वस्थ करणारा, बांधून ठेवणारा महत्वाचा दस्तऐवजही आहे. ‘(स्वतःचे) दुःख कमी करणारा या जगात माझ्याशिवाय अन्य कुणीच नाही, ईश्वर सुद्धा नाही’ – हे मानवी जीवनातले अंतिम सत्य अगदी तरुणाईतच गवसलेल्या सर्जकाचे हे स्वगत आहे. या पत्रातून लेखकासमोर येणाऱ्या धारणा इतक्या सार्वत्रिक नि सार्वकालिक आहेत, की त्या कालखंडात जगलेल्या कुणालाही त्या आपल्याच वाटाव्यात. इतके नितळ पारदर्शी जगणे आजच्या मुल्यऱ्हासाच्या वेगवान काळात आपल्या वाट्याला आले नाही म्हणून अंतर्मुख करतात. ही पत्रे वाचकाला एका वेगळ्या भावविश्वाची सफर घडवून आणतात, प्रेरक ठरतात, तशीच ती आत्यंतिक नितळतेतून जगणे समृध्द करता येते या धारणेलाही दृढ करतात. हे लेखन साहित्य नि दर्शनाची आस बाळगणारे, एक मनस्वी प्रत्यय देणारे, एखाद्या दीर्घ कथनाचा तजूर्मा म्हणून अनुभवता येणारेही आहे. मानवी जीवन-साहित्य-दर्शन यांचा बंध या पत्रातून अतिशय निगुतीने साकार झाला आहे, हे काव्यभाषेच्त्री कळ गवसलेल्या लेखकाचे यश आहे. एका कालखंडाचे दस्तऐवजीकरण करून नीलेश देशमुख यांनी मराठी साहित्यात खारीचा वाटा उचलला आहे.
Anvarat | अनवरत
Ordering from outside India? Please click here