वाई म्हटल्यावर कुणाला कृष्णाकाठ, धोम धरण, तर्कतीर्थ किंवा मेणवलीचा नाना फडणवीसांचा वाडा आठवेल. पण मला वाई म्हटलं की आठवतो पहेलवान क्वार्टर्स मधे रहाणारा दिलीप विठ्ठलराव जगताप. मला तो प्रथम कधी भेटला तर १९६५ ला फर्ग्युसन कॉलेज मधे. तो एकटा कधी नसे. कायम घोळक्यात असे. बऱ्याचवेळा त्याच्याबरोबर, मॅट्रीकला शंकरशेट मिळूनही सायन्सला गेलेला सुभाष जोशी असे. या घोळक्याचे म्होरके दिलीप आणि सुभाष या घोळात मी ३-४ वर्षे काढली.
नाटक, चित्रपट, संगीत आणि राजकारण हे चर्चेचे विषय. दिलीपचे अफाट वाचन, वाचनावर आणि प्रचलीत राजकारणावर मुद्देसुद बोलणे आणि न दुखावता आपला मुद्दा रेटणे यात दिलीप वाकबगार. यामुळे वाटायचं की हा पुढे राजकारणात जाणार की आय. ए. एस. होउन सनदी अधिकारी होणार? आमच्या घोळक्यात अन्य असायचे बापू करंदीकर, रामराजे निंबाळकर, अजित पारसनीस यावरून धोक्याची कल्पना यावी.
दिलीप आता नाटकं लिहायला लागला. त्याला आता पन्नास वर्षे उलटून गेलीत आणि तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त नाटकं त्यांनी लिहीलीत. त्याचे घोळक्यातील विचार जसे असायचे तशीच ही नाटके एकदम हटके असायची. त्यात जागतिक दृष्टीकोन, नाही रे समाजाविषयी कणव लोकशाहीवर निष्ठा, कोणत्याही हुकूमशाही विषयी घृणा आणि मुख्य म्हणजे एकूणच नाटकातून गोष्ट सांगण्याच्या परंपरागत लोकप्रिय ढाच्याला दिलेला सुस्पष्ट नकार. मराठी भाषा त्याला प्रसन्न होती. भाषेच्या नाटकीय गारूडाचे त्याला उत्तम भान आहे.
आमच्या घोळक्यात दिलीपनी अनेक पाश्यात्य नाटकांचा, त्यातील विचारधारांचा परिचय आम्हाला करून दिला. त्याची नाटके त्याच प्रकारातील असायची. पण आपल्या जवळची असायची. लोकप्रियतेचा विचार न करता, नाटक कुणी करेल न करेल, प्रसिद्ध होईल न होईल, पुरस्कार मिळेल न मिळेल याचा विचार न करता सतत ५०-५५ वर्षे लिहीत रहायला खूप धैर्य लागतं, विचारांची स्पष्टता लागते, जागतिक बदलांचे भान लागते आणि रोमँटीक वाटेल अशा आशावादानी भारलेलं मन लागतं, एकमात्र आहे की गेली ४०-५० वर्ष महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं, असं एकही गेलं वर्ष नसेल की ज्यात दिलीप जगताप यांचं नवं जुनं नाटक सादर झालं नाही. त्यांच्या नाटकांनी महाराष्ट्रातील विषेशत: ग्रामीण भागातील अनेक प्रायोगिक नाट्य संस्थांना नवचैतन्य मिळाले हे विसरून चालणार नाही. या माझ्या ज्येष्ठ मित्राच्या नाट्य प्रवासास माझा सलाम आणि या अवखळ व्यक्तिमत्वास कोंदण देणाऱ्या त्याच्या पत्नीस नंदास माझा मानाचा मुजरा.
सतीश आळेकर
ज्येष्ठ नाटककार
पूज्य गुरुजी | सशक्त | एक तळ गाळात
DRAMA (Marathi)
ISBN 978-93-84109-65-3
Hardcover
136 pages
216 mm × 140 mm
June 2021