Description
Ashutosh Potdar
₹199.00
‘आशुतोष पोतदार हरहुन्नरी, मनस्वी कलावंत माणूस. कधी नाटक त्याचा श्वास बनते, तर कधी गद्यात चौफेर प्रवास ही त्याची खास वृत्ती. मुळातच लोकसंस्कृती आणि लोकविद्या हा त्याच्या आस्थेचा विषय. भजन-कीर्तन ही त्याची घरंदाज परंपरा. लोकतत्त्वीय लय आणि लोकविद्येचे कैक हजार वर्षांचे संचित त्याच्या कवितेत कसे पाझरते, हे शोधायला उदार उसनवारीचे दृष्टिकोन कारक ठरत नाहीत. उदाहरणार्थ, “तू लिहितो अक्षरे तेव्हा समुद्रमंथनाची चाहूल लागते / तू पुसतोस अक्षरे तेव्हा भूमिगत सीता रामायण रिवाईंड करते.” यासारख्या त्याच्या कवितेतील शब्दांमधून स्त्रवणारा अर्थनाद आपल्या आत साठवू लागलो की, या कवितेचे सामर्थ्य प्रत्ययास यायला लागते. आशुतोष कसबा सांगाव ते पन्हाळा व्हाया ग्लोबल भोवताल या कवितेत बांधतो; नव्हे बांधायला त्याचे शब्द त्याला भाग पाडतात. आशुतोषच्या कवितेत असते मातीतल्या शब्दाची आण्विक ऊर्जा. म्हणून तो शेवटी म्हणतो, “उच्चार तू ही भाषा / उच्चारू दे त्यांनाही.” अशी ही सर्वसमावेशक अभिवृत्ती लोकसमूहाच्या परंपरागत लोकविद्येतून येते. या कवितेला प्रतिमा-प्रतीके आणि उपमा-अलंकार यांचा किंचितही सोस नाही. लोकलयीतून आपसूक उगवलेले कोंब या कवितेला पालवीतून आपोआप वृक्षाचे अगाधपण बहाल करतात. म्हणून आशुतोषची कविता आजच्या कवितेत वेगळी आणि आपले अनवटपण सिद्ध करणारी आहे.’
Ashutosh Potdar